देवगिरी किल्ला दर्शन
महाराष्ट्रातील अद्भुत किल्ला …’देवगिरी किल्ला’
रहस्यमय आणि ताकदवान किल्ला !! चला तर मग बघूया असे का बरे म्हणत असतील ?
देवगिरी किल्ल्याला दौलताबाद किल्ला असेही म्हणतात. महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद सध्याचे संभाजीनगर येथून फक्त 17 किलोमीटरवर असणारा हा किल्ला. सर्वात आधी किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया.
दौलताबाद गावाच्या नावावरून त्याचे नाव ठेवण्यात आले चौदाव्या शतकात याचे नाव देवगिरी होते देवगिरी यादव घराण्याची राजधानी होती. हा किल्ला 1187 च्या शतकात राजा भिल्लम यादव यांनी बांधला या किल्ल्यावर यादव, खिलजी, तुघलक आणि मुघलांनी राज्य केले असे म्हणतात. हा किल्ला तीन सत्रांमध्ये विभाजला आहे, या सर्व स्तरांची दरवाजे म्हणजे
- अबेलकोट
- महाकोट आणि
- कालाकोट
सर्वात पहिल्यांदा येतो तो महाकोट दरवाजा. येथून आत आल्यावर प्रदर्शनीय तोफा ठेवलेल्या दिसतात. या तोफा ठेवलेली ही जागा म्हणजे त्यावेळी सैनिकांना राहण्याची जागा किंवा किल्ल्याच्या राजा /सरदारांना यांना भेटायला येणारी लोक येथे राहत असत. पुढे थोडे आल्यावर दरवाजावर हत्तीचे सुंदर सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळेल. लगभग 900 वर्षापासून किल्ला सर्व ऋतूंना तोंड देत जशाच्या तसा उभा आहे. विशेष म्हणजे तुम्ही बघितले तर दिसेल की किल्ल्याचे दरवाजे आजही आपल्या जसेच्या तसे बघायला मिळतात.
चालत पुढे आल्यावर असे वाटेल की आपण किल्ल्यात प्रवेश केला आहे पण नाही अजून बरंच पुढे जायचं आहे. वळणावळणावर येणारे दरवाजे याच्या अद्भुतवास्तु कलेचं उदाहरण आहे आणि त्याचं नावच आहे रहस्यमय किल्ला !!
थोडे समोर आल्यावर आपल्याला दरवाजातून आपल्या समोर एक सुंदर आणि उंच मिनार बघायला मिळेल. तोच मिनार आपल्याला बाहेरच्या रस्त्यावरून देखील दिसतो आणि किल्ल्याकडे आकर्षित करतो. हा मिनार भारतातील सर्वात उंच मिनार पैकी एक याची उंची 210 फिट आहे. मीनाराच्या डाव्या हाताला यादव कालीन भारत मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर असलेलं पटांगण आणि तिथून दिसणाऱ्या डोंगररांगा या किल्ल्या मधून दिसणाऱ्या सौंदर्यातील एक. असे म्हणतात की या मंदिरामध्ये सध्या असलेली भारत मातेची मूर्ती भारत स्वतंत्र झाल्यावर स्थापना केली आहे. भारत मातेचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर डाव्या हातालाच एक मोठा पाण्याचा कुंड आपल्याला बघायला मिळतो तो सध्या कोरडाच आहे.
चला तर मग आता पुढे येऊया कालाकोट तटबंदीजवळ, या तटबंदीच्या बाहेर डाव्या हाताला तोफांचे प्रदर्शन ठेवले आहे आणि उजव्या हाताला अजून एक पुरातन मंदिर बघायला मिळेल. या मंदिरात सध्या कोणत्याही देवाची मूर्ती दिसत नाही पण याच्या रचनेवरून ते मंदिर असावे असे कळते. पुरातन देवगिरी साहित्य आणि कला विश्वात खूप पुढे होते. बिलावल हा राग इथूनच उदयास आला. देवगिरी ही कलागुणांना वाव देणारी राजधानी होती. दरवाजातून आत आल्यावर अजून एक दरवाजा समोर दिसतो. असे म्हणतात की या किल्ल्याचे हे वळण घेणारे रस्ते शत्रूसैन्याचा वेग कमी करत असत आणि या किल्ल्याला जिंकणे अवघड होत. या किल्ल्याच्या या वैशिष्ट्यांमुळेच 1326 मध्ये मोहम्मद तुगलक ने आपली राजधानी दिल्लीवरून देवगीरी केली होती आणि तिथेच देवगिरीचे नाव दौलताबाद ठेवण्यात आले. हा इतिहास आहे देवगिरी वरून दौलताबादचा. नंतर काही कारणास्तव मोहम्मद तुगलक ला त्याची राजधानी दिल्लीलाच घेऊन जाणे भाग पडले.
पुढे थोड्या पायर्या चढून वर आल्यावर दोन दरवाजे आपल्याला पाहायला मिळतील आजच्या परिस्थितीत एका दरवाजातून आपण पुढे येऊ शकतो. येथे एक पडीत असलेल्या महाल आपल्याला बघायला मिळेल, तो चिनीमहाल आहे. सध्या महाल पडित अवस्थेमध्ये दिसतो.. चला किल्ल्याकडे वळूया, समोर उजव्या हाताला आपल्याला एक बुरुज बघायला मिळेल सध्या त्यावर एक तोफ ठेवली आहे. ही आहे मेंढी तोफ. ही तोफ पंचधातू पासून बनवलेली आहे. या तोफेवर उर्दूमध्ये किल्ला शिकन तोफ असे लिहिले आहे म्हणजेच ही तोफ पूर्ण किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवते. या बुरुजावरून किल्ल्याचे आणि किल्ल्याच्या परिसराचे सुंदर दृश्य बघायला मिळते.
समोर थोडे पुढे आल्यावर एक पूल दिसेल त्याच्या खाली खोल दरी आहे. सध्या लोखंड आणि लाकडी दिसणारा हा पूल त्याकाळी चांबडी पासून बनवलेला होता. असे म्हणतात की शत्रू सैनिकांनी किल्ल्यावर आक्रमण केल्यावर या पुलाला काढून घेतले जात. ही दरी पूर्व पूर्ण किल्ल्याला वेढा घालते किल्ल्यावर जाण्यासाठी हा एकमेव पूल ! असे म्हणतात की दरी मधील पाण्यात त्याकाळी मगरीअसत जेणेकरून या किल्ल्यावर पाण्यातून येण्याची कोणी हिम्मत करत नसे. यामुळे या किल्ल्याची सुरक्षा पूर्णपणे वाढायची. पुलावरून आत आल्यावर असे बघायला भेटेल की छोटी दरवाजे, अरुंद आणि वळणदार रस्ते आहेत. थोडे पुढे आल्यावर शासनाने पर्यटकांच्या सोयीसाठी किल्ल्यावर सरळ चढण्यासाठी पायऱ्या बनवल्या आहेत. तसे तर हे दोन्ही रस्ते सध्या चालू आहेत पुढे तुम्हाला कोणता मार्ग निवडायचा आहे हे तुमच्या हातात. आम्हाला किल्ला पूर्णपणे माहिती करून घ्यायचा होता म्हणून आम्ही गेलो ते खालच्या बाजूने म्हणजेच पुरातन कालीन रस्त्याने. जर का तुम्हाला हा किल्ला पूर्ण जाणून घ्यायचं असेल तर मी सांगेल की तुम्ही खालच्या रस्त्यानेच पुढे जावे. रस्ता हा गुफासारखा आहे म्हणजे तुम्हाला इथे मोबाईलच्या बॅटरीची गरज पडेल कारण रस्त्याने पुढे आत आल्यावर अंधार आहे आणि बरेच भूलभुलैया सारखी रस्ते आहेत. या ठिकाणी तुम्ही किल्ल्याचे बारीक सारीक गोष्टींचा अनुभव घेऊ शकतात जसे की, नैसर्गिक हवा आणि सूर्यप्रकाश इत्यादी.
येथे बंद असलेला एक दरवाजा सरळ दरीमध्ये जातो. इथल्या पायऱ्या चढून वर आल्यावर एका भरभक्कम लोखंडी पत्राने हा एकमेव मार्ग बंद करण्याची ही सुरक्षा दिसते. तर मित्रांनो आत्तापर्यंत तुम्हाला अनुभव आलाच असेल का या किल्ल्याला अद्भुत आणि रहस्यमय किल्ला म्हणतात.
तेथून पुढे काही पायर्या चढून समोर आल्यावर पडित दरवाजाचे अवशेष दिसतात. कदाचित येथे राजांचा राहण्याची सोय असावी किंवा महल असावा त्याच्या बाजूने थोडे पुढे आल्यावर दगडाचे एक मंदिर दिसते. हे गणपतीचे मंदिर आहे. मंदिरात दर्शन घेऊन उजव्या हाताने पायर्या चढून वर आल्यावर वर एक महल दिसतो याचे नाव बारादरी महल आहे. त्याच्या बांधणीवरुन असे समजेल की तो मुघलकालीन असावा या महालाच्या विशाल धनुष्याकार खिडक्यांमधून खूपच सुंदर नजारा बघायला मिळतो. या महालात मधून व सोडून आल्यावर एक बुरुज दिसेल आणि याच्या खाली पाणी साठवून ठेवायला एक मोठा हौद केलेला आहे आणि याच्या बाजूला जनार्दन स्वामींची समाधी आहे.
पुढे आल्यावर उजव्या बाजूला कालापहाड नावाची तोफ आहे आणि डाव्या बाजूचा बुर्ज हा शेवटचा आणि सर्वात उंच बुर्ज या बुरुजावर आल्यावर दिसेल की एक तोफ ठेवलेली आहे तिचं नाव आहे दुर्ग तोफ म्हणजेच धूळधाण तोफ तिच्या नावावरूनच कळते की ही तोफ पूर्ण परिसर उध्वस्त करण्याची क्षमता ही तोफ ठेवते. म्हणूनच कदाचित या तोफला सर्वात वरती ठेवले असणार. इथे आल्यावर या बुरुजावरुन सर्व किल्ल्याची तटबंदी बघायला आपल्याला मिळेल.
असा होता आमचा देवगिरी किल्ल्याचा अनुभव. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच या इतिहासिक किल्ल्याला भेट द्या.